स्वातंत्र्यदिनी NCPचे मंत्री कुठे फडकवणार झेंडा..?अजितदादांकडे पुणे, तर चंद्रकांतदादांकडे सोलापूरची जबाबदारी?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधी झाला. खातेवाटपही झाले. पण, पालकमंत्री म्हणून त्यांच्यावर अद्याप कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी दिलेली नाही. स्वातंत्र्यदिनी ते कोणत्या जिल्ह्यात झेंडा फडकवणार? याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागून राहिली आहे. तूर्तास मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे विद्यमान मंत्र्यांवर पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ती देताना जुन्या मंत्र्यांकडून काही जिल्हे काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नगरबरोबरच सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यांनी सोलापूरच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी भाजपच्या वरिष्ठांकडे केल्याचे समजते. लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सोलापूरची जबाबदारी नको असल्याचे त्यांचे म्हणणे असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सध्या कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी नाही. मात्र, पुण्याची जबाबदारी त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे आहेत. साताऱ्याची जबाबदारी शंभूराज देसाई यांच्यावर, तर सांगलीची जबाबदारी सुरेश खाडे यांच्यावर आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या असलेली पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यास पुण्याच्या बदल्यात चंद्रकांतदादांना सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाली आहे. पुणे पदवीधरचे दोन टर्म आमदार म्हणून पाटील यांनी काम केल्याने सोलापुरातील कार्यकर्ते आणि राजकारण त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे.
विस्तार झाल्यास देशमुखांना संधी
महाविकास आघाडी सरकार व आताच्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये सोलापू्र जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात दत्तात्रय भरणे आणि आता युती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या रुपाने सोलापूरला बाहेरचे पालकमंत्री मिळाले आहेत.
आगामी निवडणुकांना सामोरे जाताना सोलापू्रला मंत्रीपद का नाही? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांसाठी अडचणींचा ठरू शकतो. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यास भाजपकडून माजी पालकमंत्री,ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांना संधी देऊन पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
सोलापू्र महापालिका पुन्हा काबीज करण्यासाठी व जिल्ह्यातील भाजपची गटबाजी शांत करण्यासाठी देशमुखांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पुन्हा भाजप जिल्हाध्यक्षपदी संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या स्पर्धेत त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment