तीन महिने आम्ही वाट पाहतो, आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही सरकारकडे जाणार नाहीत, सरकार आमच्याकडे येईल..बच्चू कडू यांचा अमरावतीत एल्गार
आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावतीत जन एल्गार मोर्चा काढण्यात आला. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाषण करताना बच्चू कडूंनी सरकारला मोठा इशारा दिला. त्यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला मोठा इशारा दिला. “आजचा मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही. आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू. आमचं नातं जात आणि धर्माशी नाही. तर आमचं नात दुःखी लोकांशी आहे. सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही का?”, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
“मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की पाठिंबा द्या. पण मोर्चा काढू नका. हा मोर्चा 50 हजार जणांचा आहे. पुढचा 5 लाख जणांचा असेल. दोन महिने झाले की सरकारकडे मागणी करा. 30 वर्षांपूर्वी काँग्रेस जे अनुदान देत होत ते अनुदान शिंदे सरकारने वाढवलं. कामे रोहयोमधून व्हावे. भाव देण्याची अवकात कोणत्याच सरकारची नाही म्हणून आम्ही स्वामीनाथन आयोगाची मागणी करत आहोत”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘सत्तेत असणं म्हणजे खाली मान घालून वखर वाहने नाही’
“साप चावल्यानंतर जर मजुराला पैसे मिळाले नाही तर पुढील पंधरा दिवसात मंत्रालयातील सचिवांच्या कार्यालयात साप सोडू”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. “प्रश्न सत्तेचा नाही. सत्तेत असणं म्हणजे खाली मान घालून वखर वाहने नाही. आम्ही मंत्री असताना दिल्लीत गेलो. आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही. आमच्यासाठी शेतकरी शेतमजूर महत्वाचा आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
“नाही नोकरी तर प्रकल्पग्रस्ताला निधी द्या. आम्ही नोकरीवर पाणी सोडले. मंत्री पदावर पाणी सोडले. या राज्यात विरोधात बोलणारा विरोधी पक्ष संपले. सत्तेत राहून कामपण करायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन काम करायचं आहे. आपल्या रक्तातच आंदोलन आहे. आंदोलन करत राहू. आपल्याला तीन महिने मेहनत करायची आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.
‘आमची युती कोणासोबत नाही झाली तरी चालेल पण…’
“आमची युती कोणासोबत नाही झाली तरी चालेल पण आपली युती मजूर, शेतकरीसोबत करू. तीन महिने आम्ही वाट पाहतो. आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही सरकारकडे जाणार नाहीत, सरकार आमच्याकडे येईल”, असं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.
“या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला जनजागृती करायची आहे. तसेच एक नवीन चळवळ उभी करायची आहे. आम्ही धर्म, जात, पंथ याच्यासाठी लढणारे नाहीत. खरंतर मुद्द्यावर लढलं पाहिजे, मुद्द्यावर सरकारसोबत असलं पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन करतोय”, असंही कडू यावेळी म्हणाले.
“वार सरकारवरच आहे, पण थोडा सौम्य गतीने आहे. याची सुरुवात आहे. ९ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे. या दिवसाच्या दिवशी नवीन क्रांती या राज्यात आणि देशाला घडायला हवी. त्यासाठी आम्ही जनआंदोलन करतोय. आंदोलन म्हणजे वार थोडी होतोय. आंदोलन हे जनजागृतीसाठी आणि नवीन चळवळीसाठीसुद्धा असतं”, असं बच्चू कडू म्हणाले.
Comments
Post a Comment