राज्य सरकारची आम्हांला मदत लागेल..ठाकरे गटाचे नेते संजय राऊत
येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीसाठी पाच राज्याचे मुख्यमंत्री येणार असून अनेक व्हीआयपी नेते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारची आम्हांला मदत लागेल, असं मत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटण्यात संपन्न झाली होती. दुसरी बैठक बंगळुरू येथे झाली. आता तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीचे यजमान उद्धव ठाकरेंकडे असणार आहे.
मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीकडे सबंध देशाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या वतीने मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. समन्वय समिती आणि नेता निवडीवर निर्णय होऊ शकतो. बंगळूरूमधील बैठकीमध्ये २६ पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले होते. मुंबईतल्या बैठकीमध्ये पक्षसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पाच राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक मोठे नेते मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच अनुषंगाने संजय राऊत यांनी राज्य सरकारची मदत लागणार असल्याचं म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही सरकारशी संवाद साधणार आहोत, कारण आम्हांला सहकार्याची गरज आहे. देशातील मोठे नेते मुंबईत दाखल होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी आमचे काही नेते चर्चा करतील, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीचं यजमानपद ठाकरे गटाकडे आहे. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या वतीने डिनरचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज वरळी येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांचीही उपस्थिती होती.
Comments
Post a Comment