जयप्रभा स्टुडिओ व्यवहार: राजेश क्षीरसागर, सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

 


राज्य शासनाच्या ताब्यातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार संस्थानकालीन अटी व शर्तींचा भंग करून झाला आहे. ५० कोटींची जागा साडेसहा कोटींत कशी घेतली? याची चौकशी करून जागेच्या व्यवहारातील प्रमुख व राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांची नार्को टेस्ट करावी, तसेच एक साधा पानपट्टीचालक असलेल्या राऊत यांनी साडेसहा कोटींची रक्कम कोठून आणली, याची ‘ईडी’ने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मुख्यत: यासंबंधीची तक्रार केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी यावेळी उपस्थित होते. नगरविकास विभागाने महापालिकेला स्टुडिओ ताब्यात घेण्यासंदर्भात दिलेले पत्र चुकीचे व बेकायदेशीर असल्यामुळे स्टुडिओची जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही घाईगडबडीने करण्यात येऊ नये. माझी त्यास हरकत आहे, अशा आशयाचे लेखी पत्र इंगवले यांनी जिल्हाधिकारी तथा प्रशासक राहुल रेखावार यांना मंगळवारी दिले. इंगवले म्हणाले, राज्य शासनाच्या ताब्यात असणारी जयप्रभाची जागा क्षीरसागर कुटुंब व पानपट्टीचालक सचिन राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे दाखवून १५ फेब्रुवारी २०२० रोजी खरेदी केली आहे. मुळात संस्थान काळात पेंढारकर कुटुंबीयांना ही जागा शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतर करता येणार नाही, अशा शर्ती व अटींवर देण्यात आली होती. तरीही भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी शक्कल लढवून लिलाव पद्धतीने ती जागा लता मंगेशकर यांना हस्तांतरित केली. तेेव्हा अटी व शर्तींचा भंग झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाची फसवणूक किंवा विनापरवाना मंगेशकर कुटुंबीयांनी ती जागा सचिन राऊत यांना खरेदी दिली. साडेसहा कोटी एकरकमी रक्कम सचिन राऊत यांनी भरली आहे.

पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न 

जागा खरेदी-विक्री करता येत नसताना तिचा व्यवहार झालाच कसा?

 पानपट्टीचालक असलेल्या सचिन राऊत यांनी एकरकमी साडेसहा कोटी आणले कोठून?

 सुमारे ५० कोटी किमतीच्या जागेचा व्यवहार साडेसहा कोटीत कसा झाला? 

राज्य शासन राजेश क्षीरसागर यांचे एवढे लाड का करीत आहे? 

क्षीरसागर यांना दिले आव्हान

 पन्नास कोटींची जागा साडेसहा कोटींत कशी घेतली, पानपट्टी चालविणाऱ्या सचिन राऊत याने एवढी रक्कम आणली कोठून, त्याने आयटी रिटर्न तरी भरले आहेत का, हे राजेश क्षीरसागर यांनी बिंदू चौकात येऊन पटवून सांगितले, तर मी माफी मागतो आणि या वादातून माघार घेतो, असे आव्हान इंगवले यांनी यावेळी दिले.

उच्च न्यायालयात जाणार 

जयप्रभा स्टुडिओच्या खरेदी-विक्री व्यवहारात अटी व शर्तींचा भंग झाला असल्याने मुद्रांक शुल्क विभाग व आयकर विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. आज, बुधवारी आयकर अधिकाऱ्यांना भेटून सचिन राऊत यांच्या आर्थिक परिस्थितीची, तसेच त्यांनी केलेल्या व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी करणार आहे. त्यांनी दखल घेतली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा इंगवले यांनी दिला. 

चुना लावणाऱ्याचा उदय

 पानपट्टीचालक असलेल्या गुलाबराव पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुखांनी मंत्री केले, त्यांनीच पक्षाला चुना लावला. आता कोल्हापुरात पानपट्टीवाल्याच्या नावाखाली चुना लावणारा एक नवीन चुनावाला कोल्हापुरात उदयास आला असल्याची टीका इंगवले यांनी यावेळी केली.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें