तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...
राज्याच्या राडकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. आधी शिवसेनेत बंड झालं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजप यांनी सरकार स्थापण केलं. या सरकारला १ वर्ष होताच राष्ट्रवादीही सत्तेत सहभागी झाली. त्यानंतर अनेकांना आपल्या पदावर पाणी सोडावं लागलं. त्यानंतर शिंदे गटातील अनेक आमदारांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.
अशातच मंत्रिपदाच्या रांगेत असलेले आमदार भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारा बाबतचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. आपल्याला मंत्रिपदाने कशी हुलकावणी दिली, याबाबत माहिती त्यांनी अलिबागमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. भरत गोगावले बोलताना म्हणाले की, 'मंत्रिपदासाठी माझाच नंबर पहिला होता, पण जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच अडचणीत आले, तेव्हा मात्र मी माघार घेतली', हे सांगत असतानात त्यांनी राजकीय पडद्यामागे नेमके काय घडत होतं, याबाबतचं वर्णन त्यांनी केलं आहे.
पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले की, 'पहिल्या नऊ जणांच्या यादीत मंत्रीपद मला मिळणार होतं, मात्र आमच्यातल्या एका सहकारी आमदाराने सांगितलं मला मंत्रीपद दिलं नाही तर माझी बायको आत्महत्या करेल. तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील. तर तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर शपथविधी नंतर लगेच मी राजीनामा देतो. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत आले, त्यामुळे मला मंत्रिपदासाठी थांबावं लागलं, असं भरत गोगावले म्हणाले.
'मी एकाला फोन केला अरे तुमच्या संभाजीनगरमध्ये पाचपैकी दोघांना मंत्रिपदे दिली आहेत. तुला काय घाई आहे, असे सांगून मी एकाला थांबवलं. आम्ही थांबलो ते अजून पर्यंत थांबलोच आहे. तेव्हा सगळ्या आमदारांनी आमचे कौतुक केले, आता मला बडबडत आहेत. आज काल पंचायत समितीचा सदस्य देखील बोलायचे सोडत नाही', असंही पुढे गोगावले म्हणाले आहेत.
अलिबाग तालुक्यात खानाव येथील काँग्रेस नेते अनंत गोंधळी यांनी शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्याला मंत्रीपद न मिळण्यामागचा किस्सा सांगितला आहे.
Comments
Post a Comment