कोल्हापुरात काँग्रेसची मोठी खेळी.!लोकसभेसाठी दिग्गज नेत्यांना उतरवणार रिंगणात..?

 


‘गेल्या पाच वर्षांत मतदारसंघ ज्यांना दिसला नाही, त्या संजय मंडलिकांना  संसदरत्न पुरस्कार मिळालाच कसा?,
’ असा सवाल करत खासदार मंडलिक यांचे नाणे आता गुळगुळीत झाले आहे, अशी टीका काँग्रेसकार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेसच्याच कार्यकर्ता किंवा नेत्यालाच लोकसभेची उमेदवारी द्यावी. उसना किंवा आयात केलेल्या उमदेवाराचा विचार करू नये. काँग्रेसशी निष्ठावंत असणारे आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्यापैकी एका नेत्याला कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आढावा बैठक घेतली. यावेळी या कार्यकर्त्यांनी आपली स्पष्ट आणि सडेतोड मते मांडली.

माजी नगरसेविका भारती पवार म्हणाल्या, ‘जिल्ह्यात भाजपची टक्केवारी नगण्य आहे, तरीही भाजपची टक्केवारी वाढवण्यासाठी संभाजी भिडेंसारखा माणूस ग्रामीण भागातून फिरवण्याचे काम भाजप करत आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात न दिसलेल्या खासदार संजय मंडलिक यांना संसदरत्न पुरस्कार कसा मिळाला, असे चंदगडमधील लोक विचारत आहेत. खासदार मंडलिक यांचे नाणे आता गुळगुळीत झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनेच लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे.’

बाजीराव खाडे म्हणाले, ‘काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यालाच लोकसभेची उमेवारी मिळाली पाहिजे. आतापर्यंत दुसऱ्यांसाठीच काँग्रेसचा वापर झाला आहे. आता तसे होऊन चालणार नाही.’ या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांचेही भाषण झाले.

सचिन चौगले, तौफिक मुल्लाणी, संभाजी जाधव, प्रकाश नाईकनवरे, मोहन सालपे, हंबीरराव चौगले यांनी काँग्रेसचाच उमदेवार असावा, अशी मागणी केली. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, अभय छाजेड, विश्‍वास पाटील आदी उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी तालुकानिहाय मांडलेले निष्कर्ष

करवीर तालुक्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गट सक्रिय आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारे कायकर्ते नाराज आहेत, तर माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे कायकर्ते शिंदे गट म्हणून नव्हे तर नरके गट म्हणून काम करतात. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीला शिवसेना ठाकरे गटाची मते मिळू शकतात.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये बीआरएस किंवा स्वराज्य संघटनेचा फारसा प्रभाव दिसणार नाही. भाजपसोबतच टक्कर आहे. मात्र, भाजपचाही प्रभाव सध्या कमी झाला असून काँग्रेसला याचा चांगला फायदा होणार आहे. कागल तालुक्यात माजी आमदार संजय घाटगे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यांना तिथे संधी दिली तर याचा काँग्रेसलाही निश्‍चित फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलही विचार व्हावा.

राधानगरी तालुक्यात आमदार आबिटकर यांना काँग्रेसकडूनच ताकद मिळाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीत फूट पडल्याने मतांची विभागणी होईल. शिवसेना शिंदे गट म्हणून आबिटकर यांच्यासोबत असला तरीही तेथे मूळ शिवसैनिक नाराज आहे. त्यांची मते काँग्रेसला निश्‍चितपणे मिळू शकतील.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जातीयवादी आणि धर्मांध यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. याला थोपवण्याचे काम केवळ काँग्रेसच करू शकते. यासाठी माजी आमदार मालोजीराजे यांना जर पक्षात सक्रिय केले तर या ठिकाणी काँग्रेस आघाडी घेऊ शकतो. चंदगड व भुदरगड तालुक्यात सतेज पाटील, पी. एन. पाटील यांना मानणारा चांगला गट आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला चांगलीच आघाडी घेता येणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेस असल्यास निश्‍चितपणे विजय मिळेल.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें