काहीतरी स्तर ठेवा. खात्री केल्यानंतरच बातम्या द्या ; जयंत पाटील प्रकरणात फडणवीस थेटच बोलले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेतली, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांवर जयंत पाटील यांनी खुलासा केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीदेखील थेटपणे भाष्य केलं आहे.
शरद पवारांच्या जवळचा एक मोठा नेता अजित पवार गटामध्ये जाणार, अशा चर्चा काल दिवसभर माध्यमांमधून झडत होत्या. शिवाय पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांची रात्री जयंत पाटलांनी भेट घेतली, अशाही बातम्या आल्या.
यावर बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोकांना अफवा उठवायला फार आवडतं. माध्यमांनी खात्री करुन बातमी दिली पाहिजे. जयंत पाटील आणि अमित शाह यांची कसलीही भेट झालेली नाही. जे पतंगबाजी करत आहेत त्यांना विनंती आहे की, काहीतरी स्तर ठेवा. खात्री केल्यानंतरच बातम्या द्या; असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, जयंत पाटील यांनीही माध्यमांसमोर येत या दाव्यातील हवा काढून घेतली. ते म्हणाले की, मी काही बोललो, कोणाला भेटलो असं काही आहे का? असं नसेल तर अशा बातम्यांमुळे सामान्य कार्यकर्ता जो सरळ मार्गाने चालला आहे, त्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं आहे. माझा पक्ष मोठा व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मी आहे इथेच आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
काय म्हणाले जयंत पाटील?
एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू आहे. काय झालं, काय नाही याचा अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे. माझी सकाळपासून या बातम्यांमुळे करमणूक होतेय. मी इकडे गेलो, मी पुण्याला गेलो अशा बातम्या येत होत्या. अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, मी आणि अजून एकजण रात्री दीड वाजेपर्यंत इथेच बसलेलो होतो. मग मी कधी पुण्याला गेलो. सकाळी, काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी तिकडे कधी गेलो? मी त्यांना कधी भेटलो याचं संशोधन झालं पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
Comments
Post a Comment