‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. पक्षात दोन गट नाहीत, शिवाय कोणताही वाद नाही,’ शरद पवारांचं आयोगाला उत्तर..
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर ८ नेत्यांनी शिवसेना-भाजपच्या सरकारला समर्थन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. पक्षात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असतील, असे सांगत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह आमचे आहे, असा दावा अजित पवार गटातर्फे करण्यात आला आहे.
शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचा चेंडु आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे. पक्षात दोन गट नाहीत, शिवाय कोणताही वाद नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड आणि विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी याबाबत दुजोरा दिल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिले आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे', असा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यानुसार अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी नोटीस पाठवली होती. आता शरद पवार गटाने याबाबत उत्तर दिलं आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून, पक्षात दोन गट नाहीत. आयोगाने त्या पत्राची दखल घेण्याची गरज नव्हती. तर अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेली मागणी फेटाळावी,’ असे त्यांनी उत्तरात म्हटल्याची माहिती आहे.
ते दावे खोटे- जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असल्याबाबतचे दावे करणारे जे दाखले अजित पवार गटाने दिले आहेत, ते देखील खोटे असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवलं त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. पक्षात फूट पडली नाही असं आम्ही सांगितलं आहे.
5 जुलैला त्यांनी एक पत्र पाठवलं आणि ते पत्र 30 जूनचे आहे असं सांगितलं आहे. अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहेत, असे भाष्य केले आहे. नंतर अध्यक्ष बदलला अशी विरोधाभासाची भूमिका अजित पवार घेऊ शकत नाहीत, असंही जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
Comments
Post a Comment