शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो.. अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल स्पष्टच सांगितलं
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याच्या काल बातम्या समोर आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या, वास्तविक असं काही नाही. मी मागे अडीच वर्षे सरकारमध्ये असताना अनेकदा प्रकल्पांच्या १५ दिवसांनी आढावा बैठका घेत होतो. त्या बैठकांमधुन प्रकल्पांना गती द्यायचे काम करायचो, आताही आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करतो' असं अजित पवार म्हणालेत.
पुढे ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांनी सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. आम्ही सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास व्हावा, कामे व्हावी म्हणून आम्ही गेलो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सरकारमध्ये गेलो, अशातच उद्या मी अर्थमंत्री म्हणून आढावा बैठक घेऊ शकतो. शेवटचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो', असंही अजित पवार म्हणालेत.
त्याचबरोबर क्षुल्लक गोष्टीचा बाऊ कशाला करता असा प्रश्न देखील अजित पवारांनी यावेळी केला आहे. दरम्यान आज चांदणी चौक येथे पुलाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.
Comments
Post a Comment