शिवसेना शिंदे गट ‘कमळ’ चिन्हावर लढणार; अपात्रेतून वाचण्यासाठी गुगली..?

  भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात एकहाती सत्ता आणावयाची आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली. शिवसेना शिंदे गट आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावर लढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

जळगाव जिल्हा त्यात आघाडीवर असेल. जिल्ह्यात सर्वांत जास्त शिवसेना गटाचे पाच आमदार आहेत. मात्र, यामुळे भाजपच्या त्या मतदारसंघातील इच्छुकांची मोठी अडचण होईल.

भाजप आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना करीत आहे. पक्षाला लोकसभा निवडणुकीत जास्तीत खासदार महाराष्ट्रातून द्यायचे आहेत. 

‘मिशन ४८’ टार्गेट निश्‍चित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला पूर्ण बहुमत तर हवेच आहे; परंतु २०० प्लसचे ‘टार्गेट’ ठेवण्यात आले.

मध्यंतरी राज्यात काही माध्यमांचे सर्व्हे झाले. त्यानंतर भाजपला काही अंशी राज्यात आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व सतर्क झाले. त्यानंतर ‘राष्ट्रवादी’ला झटका बसला व पक्षातून फुटून आमदार भाजपसोबत राज्यातील सत्तेत सहभागी झाले.

राज्यात अगोदरच शिवसेना फुटून शिंदे गटाचे तब्बल ४० आमदार सोबत आले आहेत. आता ‘राष्ट्रवादी’चेही आमदार सोबत आल्याने भाजपला अधिक बळ मिळाले. यातूनच भाजप दोन्ही निवडणुकांत आपले यशाचे मिशन फत्ते करण्याच्या तयारीला लागले आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेत चिन्हांचा वाद

शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट सोबत असला, तरी त्यांच्या निवडणूक चिन्हांचे वाद सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाला ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह मिळाले. मात्र, त्यावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्ध याचिका दाखल केली. त्यामुळे त्यांच्या चिन्हाचा वाद प्रलंबित आहे. राष्ट्रवादीतही आता ‘घड्याळ’ चिन्हासाठी फुटीर अजित पवार गट व शरद पवार यांचा गट निवडणूक आयोगाकडे गेला आहे.

त्याच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र, भाजप वेगळीच खेळी खेळण्याची शक्यता आहे. प्रारंभिक स्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. अशा स्थितीत शिंदे गट भाजपत सामील होऊन आगामी निवडणुका ‘कमळ’ चिन्हावर लढविण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा आघाडीवर असणार

शिवसेना शिंदे गटाने ‘कमळ’ चिन्हावर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल पाच आमदार शिवसेना शिंदे गटाबरोबर आहेत.

त्यामुळे जळगाव ग्रामीणचे गुलाबराव पाटील, पारोळ्याचे चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे किशोरआप्पा पाटील, चोपड्याच्या लताताई सोनवणे आणि मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे पाचही आमदार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याबाबतची सर्व रचना पूर्ण झाली असल्याचेही सांगण्यात आले.

रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये मंथन

शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेबाबत तसेच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये भाजपच्या नेत्यांची चिंतन बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ठिकाणीही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे राज्यात लढविण्यात येणाऱ्या जागांबाबत चर्चा झाली.

त्यात जळगाव जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटातून आलेल्या पाच मतदारसंघातील उमेदवारीबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. आता हे पाचही आमदार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविण्याचे जवळजवळ निश्‍चि‍त असल्याचे सागंण्यात येत आहे.

भाजपच्या इच्छुकांची होणार अडचण

जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढल्यास भाजपतर्फे काही मतदारसंघांतर्फे उमेदवारीची तयारी पक्षातील कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यात पाचोरा येथील अमोल शिंदे, पारोळा येथील करण पवार, तर जळगाव ग्रामीणमधील चंद्रशेखर अत्तरदे यांच्या तयारीचे काय? असा प्रश्‍नही निर्माण होतो.

अमोल शिंदे व चंद्रशेखर अत्तरदे यांनी तर गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवून शिवसेना एकत्र असतानाही उमेदवारांना चांगली टक्कर दिली होती. त्या वेळी भाजपनेच त्यांना अंतर्गत उमेदवारी दिल्याचा आरोपही शिवसेना उमेदवारांनी केला होता.

आता तर या उमेदवारांनी थेट पक्षातर्फे उमेदवारीचा दावाच केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शिंदे गटाचे आमदार ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविणार असतील तर भाजपतील इच्छुकांची निवडणुकीत भूमिका काय, याकडेही लक्ष असेल.

"पक्षवाढीचे कार्य करण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार आम्ही कार्य करीत आहोत. आमच्या सोबत कुणी येत असेल आणि पक्ष बळकट होत असेल तर त्यांचे स्वागतच आहे." - करण बाळासाहेब पवार, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख, भाजप

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें