सोमय्या यांचे कपडे उतरले.. पण माझ्या बदनामीचं काय? अनिल परब यांनी केली 'ही' मागणी
भाजपा नेते, किरीट सोमय्या पुन्हा एकदा राजकीय मैदानात परतल्याचं दिसुन येत आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यानंतर काही दिवस त्यांनी कोणत्याही घडामोडींनी भाष्य केलं नव्हतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सोमय्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
अनिल परब म्हणाले, "किरीट सोमय्या यांची काही कृत्य बाहेर आली आहेत, आता आणखी बाहेर येतील. किरीट सोमय्या यांना महविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही", असं परब म्हणालेत.
'गेल्या काही वर्षांमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माझ्यावर साई रिसॉर्ट संदर्भात आरोप केले होते. मी त्या दिवसापासून सांगत आहे की, माझा त्या रिसॉर्टशी संबंध नाही. मी साई रिसॉर्ट आधीच विकलं होतं. यासंदर्भात लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती, त्याबाबतची सुनावणी झाली त्याचा काल निर्णय आला आहे. या प्रकरणी याचिका फेटाळली आहे', असं अनिल परब म्हणाले आहेत.
'लोकायुक्तांनी या संदर्भात बोलताना म्हटलं की, चौकशी करण्याची आम्हाला गरज नाही. वेगवेगळ्या संघटनांनी चौकशी केली आहे. त्यामुळे आम्हाला वेगळी चौकशी करण्याची गरज नाही', याबाबतची माहिती अनिल परब यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
'त्याचबरोबर माझ्यावर जे आरोप केले ते राजकीयदृष्ट्या केले होते. मी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता. नाक घासा अन्यथा 100 कोटी द्या, असं मी म्हटलं होतं, याबाबत आता मी पुन्हा कोर्टात जाणार आहे. ईडीची चौकशी पूर्ण झाली की, पुन्हा कोर्टात जाणार असल्याचं अनिल परब यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्यात आला त्याला जबाबदार कोण? असा सवालही अनिल परब यांनी यावेळी केला आहे. तर किरीट सोमय्या यांना महविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
Comments
Post a Comment