‘युतीसाठी माझा फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध’, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य..महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढेल?
राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांची निवडणूक आगामी काळात पार पडणार आहे. याशिवाय देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडून एनडीएमधील घटक पक्षांची एकत्रित बैठक घेतली जात आहे. तर दुसरीकडे देशभरातील अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येत आपल्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवलं आहे.
इंडिया आघाडीत शिवसेना ठाकरे गट देखील आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतीलही पक्ष आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या मनात नेमकं काय आहे? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
एकीकडे आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांच्या गोटात हालचाली घडत असताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या प्रश्नावर वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं याबाबतच वक्तव्य म्हणजे त्यांना महाविकास आघाडीसोबत काही देणंघेणं नाही किंवा महाविकास आघाडीसोबत आपला काहीच संबंध नाही, असंच मत दर्शवणारं आहे. त्यांची ठाकरे गटासोबत राजकीय युती आहे. पण आपला महाविकास आघाडीशी संबंध नाही, असं प्रकाश आंबेडकर स्पष्ट म्हणाले आहे.
‘लोकसभेच्या निवडणुका महिना-दीड महिन्यामध्ये’
“माझा महाविकास आघाडीशी संबंध नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. युतीसाठी माझा फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. विशेष म्हणजे “लोकसभेच्या निवडणुका महिना-दीड महिन्यामध्ये होतील”, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी त्यांना हे कसं शक्य होईल? असं विचारण्यात आलं. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी “दीड महिन्यांनी मला विचारा कसंकाय? त्यानंतर मी सांगेन मग कसंकाय”, असं प्रत्युत्तर दिलं.
‘आम्ही कशाला डोकं लावायचं?’
“आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. भाजपच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. आम्ही आमचे उमेदवार उभे करु ना. आमची ठाकरे गटासोबत युती आहे. महाविकास आघाडीचं ठरलेलं असेल. पण आमचं मी आणि शिवसेना ठरवणार आहोत. किंवा आमचं ठरलेलं आहे. महाविकास आघाडीचं काही असेल ते त्यांचं बघतील. आम्ही कशाला डोकं लावायचं? आम्ही आमचं कशाला ब्लडप्रेशर वाढवायचं? आम्ही काय म्हणालो, आमची आघाडी शिवसेनेबरोबर आहे. आमचा जो काही समझौता होईल तो शिवसेनेबरोबर होईल”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढेल?
आगामी निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटासोबत युती असणार आहे. पण ठाकरे गट महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे आंबेडकर यांना प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करायची असेल तर अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीसोबत लढावं लागेल. 2019च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला होता.
त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये तसा फटका बसू नये, यासाठी महाविकास आघाडी काही रणनीती आखते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण आंबेडकर आपला मविआसोबत संबंध नसल्याचं वक्तव्य करत असल्याने आगामी काळात मविआच्याच अडचणी वाढतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Comments
Post a Comment