''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार
काल पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची एक गुप्त बैठक उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झाली. आज जयंत पाटलांनी भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी शरद पवारांनी मात्र ही भेट गुप्त नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांनाच चिमटा काढला.
शनिवारी पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक झाली होती. आज शरद पवार सांगोल्यात होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. कुटुंबातील व्यक्तीने वडीलमाणसाला भेटण्यात गैर काय?
ते पुढे म्हणाले की, आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलीय हे खरं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. इंडिया आघाडीची बैठक ३१ तारखेला मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये होणार आहे. ३० ते ४० वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येणार आहेत. मी, उद्धव ठाक
रे, नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अजित पवारांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी त्यांना पुन्हा विचारलं. अजित पवार तुमचे पुतणे आहेत तर मग भेट गुप्त का? त्यावर शरद पवार म्हणाले बैठक गुप्त नव्हती.. माझ्या घरी किंवा कुणाच्या घरी भेट झाली तर वावगं काय? त्यावर पत्रकारांनी मनात संभ्रम निर्माण झाल्याचं सांगितलं. मग पवार म्हणाले याचा अर्थ तुम्हाला उद्योग नाही. त्यानंतर एक हशा पिकला.
शरद पवार पुढे म्हणाले की, अविश्वास ठरावाला उत्तर देतांना देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर प्रकरणाचा अत्यल्प उल्लेख केला. त्यांनी राजकीय हल्ले जास्त केले, हे योग्य नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशाच्या हितासंबंधी चर्चा होत असल्याचंही पवारांनी सांगितलं.
दरम्यान, काल शनिवारी उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. जयंत पाटील आणि नंतर शरद पवारांनीही या बैठकीला दुजोरा दिला आहे. मात्र तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली, हे स्पष्ट झालेलं नाही.
Comments
Post a Comment