हिंमत असेल तर सतेज पाटलांनी एका व्यासपीठावर समोरासमोर यावं; शौमिका महाडिक
गोकुळसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना आमदार सतेज पाटील यांनी हिंमत असेल तर स्वत: उत्तरे द्यावीत, असे आव्हान ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिले.
‘प्रसारमाध्यमांसमोर येण्याचे धाडस नसल्यानेच विद्यमान चेअरमनना वेठीस धरून ‘जबरदस्तीने’ त्यांच्या सहीचे पत्रक सतेज पाटलांनी प्रसिद्धीस दिले आहे. मी केलेले आरोप जर खोटे असतील तर आजही माझे खुले आव्हान स्वीकारावे आणि सतेज पाटलांनी कधीही एका व्यासपीठावर सामोरासमोर यावे. सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याची माझी तयारी आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, ‘गोकुळ’चे नेते कालपर्यंत घटलेले दूध संकलन आणि विक्री याबाबत चिंता व्यक्त करत होते. आज तेच लोक संघ कसा फायद्यात आहे, हे पटवून देत आहेत, ही बाब हास्यास्पद आहे. नेत्यांचा हा विरोधाभास लक्षात न येण्याएवढी जनता दूधखुळी नाही. सत्तांतर होऊन दोन वर्षे झाली, तरीही महाडिकांचे टँकर आणि जावयाचा ठेका या पलीकडे विचार न करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
एकीकडे दूध संघाची स्वतःच्या कुकर्माने वाताहत केलेली असताना, अजूनही वैयक्तिक आरोपांमध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांकडून दुसरी अपेक्षा नव्हती. गोकुळचे दूध संकलन घटले आहे. मुंबईतील दूध विक्री घटली आहे. पुण्यातील वितरण व्यवस्था चांगली असताना ठेका का बदलला, हे प्रश्न विचारले असताना कोणाच्या जावयांचा किंवा पै-पाहुण्यांचा ठेका आहे, याची उत्तरे दिली आहेत.
संघ टिकला पाहिजे, याचे भान ठेवावे
‘विद्यमान अध्यक्ष, संचालक यांच्या पै-पाहुण्यांकडे किती ठेके आहेत, कोणाचे किती पै-पाहुणे गोकुळमध्ये नोकरीला लावले आहेत, राधानगरी वाहतूक संघ किंवा शेतकरी संघ या नावांखाली कोणाच्या किती गाड्या गोकुळला लावल्या आहेत, पॅकिंग किंवा वितरण व्यवस्था बदलताना कोणते नेते किंवा अधिकाऱ्यांनी किती टक्केवारी ठरवून दिलेले आहे, या सर्व गोष्टींचा खुलासादेखील मी करू शकते; पण वैयक्तिक टीका न करता संघ कसा टिकला पाहिजे. याचे भान सर्वच सत्ताधारी नेत्यांनी ठेवावे, असेही महाडिक यांनी पत्रकात म्हटले आहे.
Comments
Post a Comment