अजितदादा मैत्रीचा पक्का माणूस पण सत्तेचाही पक्का... विजय वडेट्टीवारांचा सुचक इशारा
महाराष्ट्रात झालेलं तोडफोडीचं राजकारण जनतेला अजिबात पटलेलं नाही. जनता निवडणुकीची वाट बघत आहे. लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालला आहे. देशात आणि राज्यात ही परिस्थिती आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही लोक गेली पण त्या पक्षावर कुठलाही परिणाम होणार नाही. सर्व्हेनुसार शिंदे सेनेचे फक्त दोन खासदार निवडून येणार आहेत. राष्ट्रवादीचे देखील तेच आहे. भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळतोय. काल परवा ज्यांना चोर,डाकू, लुटेरे म्हणत होते, त्याच टोळीत घुसून मलिदा खाण्याचे प्रवृत्ती पुढे आली काय?, असा प्रश्न जनतेच्या मनात असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार यांचा टेकू म्हणून वापर -
पूर्वी शिवसेना फोडली तेव्हा अमित शाह यांना सत्तेत येण्याची शाश्वती नव्हती. आता अजित पवार आले त्यामुळे शाश्वती वाढली असे अमित शाह म्हणत असतील तर ती ताकद भाजपची आहे की अजितदादाची?. भाजपला नाकारलं म्हणून तुम्ही अजित पवार यांचा टेकू म्हणून वापर करत असाल तर तुमचा अंदाज खोटा ठरेल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
भाजपने लोकांचा विश्वास गमावला -
विजय वडेट्टीवार म्हणाले, हे (एकनाथ शिंदे, अजित पवार) तिकडे जाऊन गुलाम होत आहेत. गुलामांच्या लाईनीत हे सगळे मंडळी बसत आहेत. भाजपची स्वबळावर निवडणूक जिंकण्याची ताकद नाही. कारण भाजपने लोकांचा विश्वास गमावला आहे. म्हणून त्यांना पुरोगामी विचारांच्या माणसाची गरज पडली.
भुजबळ ओबीसीचे राहीले नाहीत -
छगन भुजबळ जातील असं कोणालाही वाटलं नव्हत. मात्र ही सत्तेची लाचारी आहे. ते आता ओबीसीचे राहीले नाहीत. त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागेल.
दादा मैत्रीचा पक्का माणूस पण.. -
आज फ्रेंडशिप डे आहे. दादा मैत्रीचा पक्का माणूस पण दादा सत्तेचा देखील पक्का माणूस त्यामुळे आमची मैत्री आणि सत्ता अबाधित राहो, असा सुचक इशारा वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार काँग्रेसमध्ये आहेत तर अजित पवार भाजपसोबत सहभागी झाले आहेत. त्यामुळे दोघांची सत्ता कशी अबाधित राहील?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment