शेंडी-जाणव्याचं आणि घंटा बडवणारं आमचं हिंदुत्व नाही...संभाजी ब्रिगेडसोबत हातमिळवणी केल्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात
ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्यावतीने संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीमध्ये बोलतांना उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. या बैठकीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
२६ ऑगस्ट २०२२ रोजी शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली होती. त्यानंतर आज पहिल्यांदाच संयुक्त बैठक झाली. मंचावर सुभाष देसाई, दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकरांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांशी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आमचं हिंदुत्व सोडलेलं नाही. प्रबोधनकारांचं हिंदुत्व वेगळं, बाळासाहेबांचं वेगळं, माझं वेगळं आणि आदित्यचं वेगळं असं होत नाही. आमचं हिंदुत्व एकच आहे आणि एकच राहणार. शेंडी-जाणव्याचं आणि घंटा बडवणारं आमचं हिंदुत्व नाही
ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले, जगातल्या सगळ्यात मोठ्या हिंदुत्वाच्या नेत्याच्या काळात हिंदुंना मोर्चा काढावा लागतो, हे दुर्दैव आहे. मला देवेंद्र फडणवीस यांची दया येते. त्यांचं असं झालंय की सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही. काहीजण सांगतायत की, आता हे काँग्रेस फोडणार आहेत. मग आणखी एक उपमुख्यमंत्री करावा लागेल. फडणवीस मग मस्टर मंत्री राहणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'भाजपमध्ये सगळे आयाराम झाले आहेत. परंतु खरा राम आमच्या हृदयात आहे. तुम्ही इंडिया आघाडीला इंडियन मुजाहीद्दीन म्हणता मग तुम्ही परदेशात जाता तेव्हा कोणत्या इंडियाचे पंतप्रधान म्हणून जाता?'' असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, आजदेखील औरंगजेब जिवंत आहे. इथं दुहीची बिजं पेरली जात आहेत अन् तमाम दौलत संपवली जात आहे. हा औरंगजेब तुमच्यातच दडलेला आहे. तुम्हांला औरंगजेबाच्या घराणेशाहीचा इतिहास आहे. असं म्हणत त्यांनी फडणवीसांसह दिल्लीतील भाजप नेत्यांवर सडकून टीका केली.
Comments
Post a Comment