कोल्हापुरात अजित पवार तर सोलापुरात हसन मुश्रीफ फडकवणार 'तिरंगा'; शासनाकडून ध्वजवंदन यादी जाहीर


  राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी व त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार अशी चर्चा असतानाच आता शासनाने स्वातंत्र्यदिनानिमित्त  जिल्हानिहाय ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात कोल्हापुरातील ध्वजवंदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात ध्वजवंदन होणार आहे. सध्या मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकाही मंत्र्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही. महाविकास आघाडीच्या काळात पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.जुलैत राष्ट्रवादीतून बंडखोरी करत पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद दिले जाईल अशी शक्यता होती; पण सध्या तरी पालकमंत्री बदलणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच हस्ते स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन होईल.

स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा मुख्यालयात होणारा ध्वजवंदनाचा कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा आहे. शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे. भविष्यात अतिरिक्त जिल्ह्यांची जबाबदारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

हे गृहीत धरूनच शासनाने ध्वजवंदन करणाऱ्या मंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे मुंबईचेही पालकमंत्री आहेत. त्यामुळे केसरकर यांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन होईल.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें