NCP ला खातेवाटप करताना मोठा फटका भाजपाच्या मंत्र्यांना बसणार; कोणाची खाती जाणार?

 राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच खातेवाटप करतील. त्यात आपल्याकडील खात्यांचा त्याग हा भाजपच्या मंत्र्यांना अधिक करावा लागणार आहे. शिवसेनेतील फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील काही खाती राष्ट्रवादीला जातील असे चित्र आहे. शिंदे यांच्याबरोबर जे ४० शिवसेना आमदार गेले. त्यातील ९ मंत्री झाले. त्यांच्यापैकी बहुतेकांकडे एकच खाते आहे. दुसरे खाते असेलही तर ते कमी महत्त्वाचे आहे. भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे मात्र दोन-तीन तुल्यबळ खाती आहेत. विस्तारामध्ये त्यातील काही खात्यांवर नक्कीच टाच येईल.भाजपच्या ज्या मंत्र्यांकडील एक- दोन खाती जाऊ शकतात त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे १३ तर फडणवीस यांच्याकडे ७ खाती आहेत. शिंदे स्वत:कडे नगरविकास, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क ही खाती कायम ठेवतील. फडणवीस यांच्याकडील वित्त खाते अजित पवार यांना दिले जाईल व गृह खाते फडणवीस यांच्याकडे राहील असे मानले जाते. अजित पवार यांना वित्त खाते मिळाले तरी ते पूर्ण अर्थसंकल्प मांडू शकणार नाहीत. कारण पुढील वर्षी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाण्याची शक्यता अधिक आहे.

काय होऊ शकतात बदल? 

वैद्यकीय शिक्षण हे महाजन यांचे आवडीचे खाते आहे, मात्र ते त्यांच्याकडून जाऊ शकते. त्यांनी याच खात्यासाठी आग्रह धरला तर महत्त्वाचे ग्रामविकास खाते त्यांच्याकडून जाईल. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे महिला व बालकल्याण, पर्यटन व कौशल्य विकास ही तीन खाती आहेत. त्यातील एक वा दोन जातील. महिला व बालकल्याण त्यांना गमवावे लागेल असे समजते. रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते कायम राहील पण अन्न व नागरी पुरवठा खाते हे राष्ट्रवादीकडे जाईल. तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील पशुसंवर्धन खाते काढले जाऊ शकते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज ही तीन खाती आहेत, त्यातील एक वा दोन जातील, असे सूत्रांनी सांगितले. ज्येष्ठता लक्षात घेता मुनगंटीवार यांच्या खात्यांना धक्का लावला जाणार नाही, असेही म्हटले जाते.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..