'पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय', मनसेचं भाजपला प्रत्युत्तर..
गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नेत्यांनी दौरे, बैठका सुरू केल्या आहेत. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे दौऱ्यावर असताना सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांची गाडी अडवली होती म्हणुन फोडला होता.
टोल नाक्यावर अमित ठाकरे यांचा अपमान झाला, म्हणून टोल नाका फोडला असं मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे होतं. सिन्नर टोल नाक्यावर अमित ठाकरे यांना अर्धातास थांबवल्याचा आरोप करण्यात आला होता. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला होता.
दरम्यान मनसैनिकांनी केलेल्या या तोडफोडीवर आता भाजपाने ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यासंबधीचा एक एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये भाजपाने थेट अमित ठाकरे यांना टार्गेट केलं आहे.
भाजपच्या या ट्विटनंतर मनसेने ट्विट करुन पुन्हा भाजपला डिवचलं आहे. बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? असा सवाल विचारुन मनसेने देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे.
इर्शाळवाडीची दुर्घटना घडल्यावर अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दोषी ठरवत पक्ष फोडण्यापेक्षा इर्शाळवाडीवर लक्ष दिले असते तर असा प्रकार टाळता आला असता, असं म्हटलं होतं. अमित ठाकरेंची टीका भाजपला चांगलीच जिव्हारी लागली आहे. अशातच अमित ठाकरेंचं टोलनाका तोडफोड प्रकरणही समोर आल्याने भाजपने टीकेची संधी सोडली नाही. आता मनसे-भाजप यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसुन येत आहे.
भाजपने काय म्हंटलं आहे ट्विटमध्ये?
“अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा” असा खोचक टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाने एक व्हिडिओ पोस्ट करुन अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपाने व्हिडिओमधून अमित ठाकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिटं थांबवली असंही भाजपाने म्हंटलं आहे. टोल नाका फोडल्याचं समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला असं देखील भाजपाने म्हंटलं आहे.
त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर खोट बोलण्याचाही आरोप यावेळी केला आहे. अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडलं, असं देखील व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
मनसेकडून भाजपला जोरदार उत्तर
अमित ठाकरेंचं पक्ष फोडण्यासंबंधीचं विधान इतकं झोंबलंय कि पृथ्वीवरचा सर्वात मोठा पक्ष ह्या ३१ वर्षाच्या तरुणावर तुटून पडलाय. आणि हो, कायदा-सुव्यवस्थेची इतकी काळजी असेल तर महाराष्ट्रातल्या मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण का वाढतंय? मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने का वार होत आहेत? बस अपघातांमध्ये आपली माणसं दगावतात आणि एकीकडे त्यांचा अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून मंत्र्यांचे शपथविधी कसे घेतले जातात? माणसं किड्या-मुंग्यांसारखी मरत आहेत आणि त्याचं सोयरंसुतक नसणारे निरंकुश सत्ताधीश पक्ष फोडण्यात मश्गुल आहेत, असं ट्विट करत मनसेने देखील भाजपला जोरदार उत्तर दिलं आहे.
Comments
Post a Comment