“ही दोस्ती तुटायची नाय” नागपुरात झळकले अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स..
राज्याचे दोन्ही उपमुख्यमत्री अजित पवार आणि देवेंद्र पडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांचे सोबत फोटो असलेले बॅनर्स झळकले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर “ही दोस्ती तुटायची नाय” अशी मराठी गाण्याची ओळ लिहून दोघांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
एवढंच नाही तर या बॅनर्सवर “राजकारणातील ‘दादा’ अजित दादा आणि राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस असे देखील लिहिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जवर एका बाजूला शरद पवार यांचा देखील फोटो आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आहे.
वृत्तपत्र जाहिरातीतही दोघांसोबत शरद पवारांचा फोटो
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत शरद पवारांचा फोटो आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मंत्री संजय बनसोडे यांनी दिलेल्या वृत्तपत्रातील जाहिरातीत दोघांच्या फोटोच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र एका चौकटीत ठेवण्यात आले आहे.
शरद पवारांच्या आवाहनानंतरही वापरला फोटो
यापूर्वीच शरद पवार यांनी आपला फोटो न लावण्याचे आवाहन केले होते. तरी देखील राष्ट्रवादीतला फुटीर गट पवारांचे फोटो बिनदिकत्त वापरत असल्याचे पहायला मिळत आहे. फुटीर गटाचे आमदार वारंवार पवारांना भेटने, बॅनरवर फोटो वापरणे या घटनांवर पवारांनी किंवा राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अशात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Comments
Post a Comment