शरद पवारांनंतर उद्धव ठाकरे देखील मैदानात! संजय राठोडांच्या बालेकिल्ल्यात घेणार सभा
राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी पक्षाच्या फेर उभारणीसाठी महराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यानंतर पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आजपासून राज्याचा दौरा सुरू करणार आहेत. यापूर्वी मातोश्रीवर झालेल्या पक्षाच्या बैठकीत उद्धव यांच्या दौऱ्यावर सहमती झाली होती.आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्याची सुरूवात दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्याने करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आज यवतमाळ येथे पोहरादेवीच्या दर्शनानंतर दिगलस येथील कृषी उत्पन्न बाजार समीती येथे सभा घेणार आहेत.
दरम्यान पक्षात पडलेले उभी फूट आणि मुख्यमंत्री पद गमावल्यांतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरा देवी येथे येत आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या विदर्भ दौऱ्यात शिंदे गटात गेलेले संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी समान नागरी संहिता (यूसीसी)बाबत पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली. आमचा यूसीसीला पाठिंबा असून या प्रकरणावर पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, जोपर्यंत UCC मसुदा तयार होत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत नाहीत असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
शनिवारी महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्रतेच्या मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. शिंदे गटाच्या ४० आणि उद्धव गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याचे नार्वेकरांनी सांगितले. आमदारांना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment