राज्यपाल नामनियुक्त आमदारांचे सूत्र ठरले! भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाला किती जागा मिळणार?


 सर्वोच्च न्यायालयाने विधान परिषदेतील 12 राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठविल्यानंतर राज्य सरकारकडून या नियुक्त्या तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महायुतीने सदस्य संख्येचे सूत्र निश्चित केले असून भाजपच्या वाट्याला 6, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळणार असल्याची माहीती समोर आली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने 12 सदस्यांची यादी राज्यपाल रमेश बैस यांना दिली जाईल, अशी माहिती 'साम टिव्ही'ने सूत्र्याच्या हवाल्याने दिली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आघाडी सरकारने नोव्हेंबर २०२१मध्ये १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची यादी राजभवनाला दिली होती. मात्र तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या यादीला मान्यता दिली नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी रद्द केली. मात्र यादरम्यान हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलैला ही स्थगिती उठवल्याने १२ नियुक्त्यांसाठी हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे.

राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर जाण्यासाठी महायुतीत अनेक जण इच्छुक आहेत. भाजप आणि शिंदे गटात इच्छुकांची संख्या जास्त आहे. भाजपची नावे दिल्लीतून निश्चित होतील, तर शिंदे आणि अजितदादा गटाची नावे अनुक्रमे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निश्चित केली जातील. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या १२ नियुक्त्या केल्या जातील. या नियुक्त्यांनंतर विधान परिषदेतील संख्याबळाचे पक्षीय समीकरण बदलणार आहे.

आमदारांच्या संख्याबळानुसार जागा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट सरकारमध्ये सहभागी होण्याआधी भाजप आणि शिंदे सरकार यांच्यात ८ आणि ४ असे सूत्र निश्चित झाले होते. मात्र अजित पवार यांच्या सहभागानंतर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी राज्यपाल नामनियुक्तीच्या समान म्हणजे प्रत्येकी ४ जागा घ्याव्यात, अशी चर्चा झाली, परंतु तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचे सूत्र निश्चित करण्यात आले.

त्यानुसार भाजपच्या कोट्यातून ६, तर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून प्रत्येकी ३ नावे दिली जाणार आहेत. तत्पूर्वी या नावांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाईल. त्यानंतर १२ सदस्यांची एकत्रित यादी राजभवनाला पाठवली जाईल. विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त आमदारांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने तिन्ही पक्षांकडून आता कुणाला संधी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सूत्र्याच्या हवाल्याने दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

''भेट गुप्त नव्हती... तुम्हाला उद्योग नाही, भेटण्यात गैर काय?'' ;शरद पवार

तर दुसरा एक जण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाहीत, माझं राजकारण संपवतील...

'गेंड्याच्या कातडीपेक्षा निगरगट्ट कातडी राजकारण्यांची झालीय' ; उद्धव ठाकरें