कोल्हापूरकरांना दिलासा ! पुराच्या भीतीमुळे स्थलांतरित झालेल्यांना घरी जाण्याच्या सूचना..
दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये पुराने थैमान घातलं होतं. तशीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पूरसदृश्य भागातून नागरिकांचे स्थलांतरित करण्यात आलेले होते.
स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्या सकाळपासून घरी जाण्यास प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. उद्या पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी एक-एक इंचाने वाढली असली तरी नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, असं आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.
''सतर्कता म्हणून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू होतील. बालिंगा पूल हा एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असून मुलांच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी वेगळी तारीख देण्यात येईल, मुलांच्या परीक्षेवर अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही'' असं पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी लागू असणार आहे. मुंबईत मोठ्या वादळी वाऱ्याची शक्यता आहे, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आल्याचंही केसरकरांनी स्पष्ट केलं. जुलै 2021 मध्ये भूस्खलन होऊन जीवितहानी झालेल्या कुपलेवाडी (ता. राधानगरी) व पखालेवाडी येथील 92 कुटुंबांनी स्थलांतर करत येथील शाळांचा आसरा घेतला आहे. डळमळीत झालेला हा भाग सुदैवाने आहे त्या स्थितीतच राहिला असला तरी भविष्यासाठी धोक्याची घंटाच ठरला आहे.
या घटनेला दोन वर्षे झाली असली तरी पावसाचा जोर वाढला की, येथील अनेक कुटुंबांत धाकधूक निर्माण होत आहे. गेले आठवडाभर परिसरात संततधार पाऊस पडत आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व महसूल प्रशासनाने या परिसराची पाहणी करून अतिवृष्टीच्या काळात धोक्याची शक्यता लक्षात घेत कुपलेवाडी व पखालेवाडी येथील 92 कुटुंबांना राहती घरे सोडण्याचे लेखी आवाहन सरपंच तसलिम पखाली, ग्रामसेवक टी. के. मडवळ, तलाठी एस. एल. हजारे, पोलिस पाटील शिवाजी पाटील यांनी केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत येथील कुटुंबांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांचा सुरक्षेसाठी आसरा घेतला आहे.
Comments
Post a Comment