शिक्षक भरतीसाठी आमदारांची शाळेवरच धडक; चंद्रकांत पाटलांचा आक्रमक पवित्रा..
शिक्षण विभागातील शिक्षकांसह इतर रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, अन्यथा टाळे ठोकण्याचा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला होता.
परंतु एक महिना उलटूनही संबंधित विभागाने या संदर्भात कुठलीही कारवाई न केल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत सोमवारी (ता. १७) सकाळी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला उद्देशाने शाळेत पोहोचले आमदारांचा आक्रमक पवित्रा पाहता जिल्हा प्रशासन हादरून गेले होते.मुक्ताईनगर व बोदवड या मतदारसंघात येत असलेल्या दोन्ही तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांना शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी सोमवारी सकाळपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये हातात कुलपे घेत धडक दिली.
त्यांनी अपूर्ण शिक्षक संख्येमुळे शाळांना कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला होता. शिक्षक अपूर्ण असल्यामुळे अडचण झाली आहे, असे सांगितले. यावेळी आमदार पाटील यांच्यासह समर्थक व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
आमदार पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत थेट वर्गात शिरत शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांकडून धक्कादायक बाबी समोर आल्या. एका वर्गात चौथी व पाचवीचे विद्यार्थी बसविण्यात आले होते.त्यात चौथीचे २५ व पाचवीचे १०, असे ३५ विद्यार्थी होते. तेथे चौथीची तासिका घेतल्यानंतर, पाचवीच्या विद्यार्थ्यांची घेतली जात होती. अशी कसरत शिक्षकांचीही होत आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांवर ताणच पडत असेलच, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
गेल्या चार महिन्यांपासून अर्थात शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे समस्या, प्रश्न मांडले. मात्र, जिल्हा परिषदेकडून शिक्षक नियुक्तीची कार्यवाही झालेली नाही. मिळालेल्या अहवालातील माहितीनुसार मुक्ताईनगरमध्ये १६०, तर बोदवडमध्ये ६८ शिक्षक कमी आहेत.
वर्षानुवर्षांपासून हीच रिक्त पदांची स्थिती आहे. मधल्या काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेट घेत पुन्हा समस्या मांडल्या. मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा, चारठाणा येथे तर शून्य शिक्षकी शाळा झाल्या आहेत.हेच धोरण जिल्हा परिषद प्रशासनाचे असेल तर विद्यार्थ्यांचे भविष्य काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील १०७ शाळांमध्ये १६० शिक्षक कमी आहेत, तर बोदवडच्या शाळेत अवघे तीन विद्यार्थी आणि तीन शिक्षक आहेत, असे दिसून आल्याचे ते म्हणाले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माझ्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत येत्या आठ दिवसांत शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आंदोलन तूर्त मागे घेतले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी विकास पाटील हे आले असून, त्यांनीही शिक्षक प्रश्नाबाबत ग्वाही दिली आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment