'चिन्ह राहिलं नाही तरी…', निवडणूक आयोगाच्या नोटीशीनंतर घड्याळ चिन्हाबाबत रोहित पवाराचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. यानंतर राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला. या प्रकरणी निवडणूक आयोगाने बुधवारी (२६ जुलै) शरद पवार आणि आजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाला नोटीस बजावली आहे. अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'गेल्या काही वर्षांमध्ये निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते, असं सामान्य लोकांचं मत झालं आहे. निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण करत असताना दोन्ही बाजुचे गट ताकद लावतील आणि युक्तीवादही होईल, पण, निवडणूक आयोग कोणाच्या बाजुने निर्णय देईल, याचा अंदाज सर्वांना आहे', असंही रोहित पवार म्हणालेत.
'आम्ही न्यायालयात लढाई लढू. पण, येत्या काळात लढत असताना चिन्ह राहिलं नाही, तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणतं चिन्ह मिळालं पाहिजे. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावं लागणार, याचा अंदाज आला आहे,' असं रोहित पवार यांनी पुढे म्हटलं आहे.
तर 'त्यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत. शरद पवारांबरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचं आहे,' असंही रोहित पवार यांनी पुढे सांगितलं आहे.
Comments
Post a Comment