टोमॅटो-टोमॅटो काय करताय, सिलेंडर स्वस्त करायला सांगा; सदाभाऊंचा सरकारला घरचा आहेर
मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरांनी रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सर्वत्र टोमॅटोच्याच दराची चर्चा होतेय. सोशल मीडियावर देखील टोमॅटो दरवाढीचे मीम्स बनविण्यात येत आहेत. या दरवाढीवर माजीमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.सदाभाऊ खोत म्हणाले, कोरोनानंतर मोठी महामारी आली ती म्हणजे टोमॅटो महामारी. हा नवा विषाणू महाराष्ट्रात आला आहे. कोरोनात अनेक माणसं मेली. तसं या टोमॅटो महामारीने रोज मरणाऱ्यांचा आकडा वाढायला लागला आहे. आता दवाखाने तुडुंब भरले आहेत आणि सगळे डॉक्टर चिठ्ठीवर लिहून देताहेत टोमॅटो, अशी खोचक टिप्पणी सदाभाऊ खोत यांनी केली.
दोन पैसे वाढले असतील, गावगाड्यातील शेतकऱ्याला मिळत असतील तर काय हरकत आहे. जो किलोभर टोमॅटो पाच माणसांना लागत असेल त्यांनी अर्धा किलोवर या. अर्धा किलो लागत असेल त्यांनी पावशेरवर या आणि ज्यांना परवडत नसेल त्यांनी दोन तीन महिने टोमॅटो खाऊ नका. टोमॅटो नाही खाल्ला म्हणून मरायला लागलाय? असा सवाल खोत यांनी केला.
तसेच खाऊ नका टोमॅटो, त्याच्या ऐवजी दुसरी भाजी खा. मिरचेची भाजी करा. स्वस्त आहेत. हिरव्या मिरच्यांची भाजी विदर्भात करतात मिरच्यांचे माडगं करा आणि पीत बसा. टोमॅटो, टोमॅटो करताय...काय ज्यूस पिवून अंघोळ करताय टोमॅटोचं?
सिलेंडर महाग झालंय त्याला अनुदान द्यायला हवं ही मागणी करायला हवी सरकारकडे, पण टोमॅटो महागला म्हणून कोणी दंगा करत असेल तर दोन तीन महिने थांबा
टोमॅटो काय अटॉम बॉम्ब आहे का दोन तीन वर्षे बाजारात यायला लागतील, दोन तीन महिने थांबा...मग टोमॅटो करतो मग काय ज्यूस प्या...काय नाचायचं तेवढं नाचून घ्या लोळून घ्या. लोकांचे जिभेचे चोचले चालले आहेत. रोज काय टोमॅटो उरावर घेऊन बसताय का? असा सवाल खोत यांनी केला.
मला पण वाटतं माझा नंबर लागेल
मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यात कोणाला घ्यायचे हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम पाहून मी या सरकारमध्ये सामील झालो. सगळ्यांना कोळून प्यायलेला कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतील. फडणवीस यांना बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधक करत असतात. 9 महिन्यात बाळंतपण होतं, पण हे गडी कधी पण बाळंत होतात. राजकारणात प्रत्येकाला वाटतं की नंबर लागेल. मला पण वाटतं माझा नंबर लागेल, असंही खोत म्हणाले.
Comments
Post a Comment