शिवसैनिकांनी आमदार रवी राणांचे पोस्टर फाडले; अमरावतीत वातावरण तापले
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांच्याकडून हनुमान चालिसा पठनाच्या आयोजनाबाबत लावलेला फलक रविवारी फाडून टाकला. यावेळी शिवसैनिकांनी रवी राणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडवट टीका केली असतानाच त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे हे पावसाळ्यातील बेडकाप्रमाणे आता बाहेर पडले आहेत, अशी बोचरी टीका राणांनी केली आहे. दुसरीकडे, रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळीच येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हनुमान चालिसा पठनाचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे सरकारने हनुमान चालिसाचा विरोध केला आणि त्याचे पठन केल्याबद्दल खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना १४ दिवस तुरुंगात टाकले, असा उल्लेख असलेले फलक शहरात लावण्यात आले आहेत. या फलकावर नवनीत राणा यांचा उल्लेख हिंदू शेरणी असा करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment