''नरेंद्र मोदी अन् शरद पवार चांगले मित्र, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी...'' शिंदे गटाची प्रतिक्रिया चर्चेत
कालपासून दोनदा अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार गटाने शरद पवारांना एकत्रित काम करण्यासंदर्भात मनधरणी केली. मात्र शरद पवारांनी अद्याप मौन बाळगलेलं आहे. राष्ट्रवादीतल्या नाट्यमय घडामोडींवर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शरद पवार जेष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आमदार गेले असतील तर त्यात वाईट काय आहे. राष्ट्रवादीचं मनोमिलन व्हावं ही आमची इच्छा आहे. मोदी साहेब आणि पवार साहेब चांगले मित्र आहेत, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी दोघांनी एकत्र यावे ही इच्छा असल्याचं केसरकर म्हणाले.
काल अचानक अजित पवार गटाचे मंत्री आणि काही नेते शरद पवारांच्या भेटीसाठी वायबी सेंटरमध्ये पोहोचले होते. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना सोबत काम करण्याची विनंती केल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर जयंत पाटील यांनीही फुटीर गटाने दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगून ते पक्षात परत आले तर आनंदच होईल, अशी भूमिका मांडली.
मात्र पवार काहीही बोलले नव्हते. त्यानंतर झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवारांनी पुरोगामी विचारांसोबत पुढे जाण्यासंदर्भात भाष्य केलं. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरुय, हे अद्याप स्पष्ट होत नाहीये.
आज पुन्हा अजित पवार गटाच्या आमदार, नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. काल काही आमदार मतदारसंघात होते, त्यामुळे शरद पवारांचे आशीर्वाद घेता आले नव्हते. आज त्यांनी आशीर्वाद घेतले. पवार साहेबांना पुन्हा सोबत काम करण्यासंबंधी विनंती केल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितलं.
Comments
Post a Comment