दुर्घटनास्थळी शिवभोजन थाळी वाटपाचे आदेश, लोकांना किराणा पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश..
गुरुवारी (दि. २० जुलै) खालापुर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे दुर्दैवी घटना घडली. या गावावर रात्री दरड कोसळली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळी वाटप करण्याचे आदेश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आले आहेत. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरुन हे भोजनाचे पॅकेट दिले जातील. त्याचबरोबर ५ लिटर रॉकेलही दिले जाणार आहे.
तसेच गावाचा संपर्क तुटल्याने लोकांना काही प्रमाणात किराणा देखील देण्यात येईल. यामध्ये १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा पीठ, तूरडाळ, तेल आणि साखरेचा समावेश आहे.
तसेच जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरुचं राहीलं. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने याबाबत आदेश देण्यात आले आहेत. लोकांच्या मदतीसाठी त्याठिकाणी पोलिस कंट्रोल रुम देखील उभारण्यात आलंय.
बचावकार्य सुरु
८० जणांचं बचावपथक बचावकार्यासाठी या इर्शाळगड या ठिकाणी पोहोचलेलं आहे. नागरिकांना ढिगाऱ्यातून काढायचे काम सुरु आहे. मात्र, या गावात जेसीबी जाण्यासाठी मार्ग नसल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होतं आहे.
तसेच बचावकार्यासाठी जेसीबी पोहोचवण्यासाठी एअरलिफ्ट करण्याच्या पर्यायाचा देखील विचार केला जातोय. मात्र, मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणामुळे हे एअरलिफ्ट केलं जाण्याची शक्यता कमी आहे. पावसामुळे बचावकार्यातही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतं आहे.
Comments
Post a Comment