खातेवाटपाचा तिढा सुटला! अर्थ खातं अजित पवारांकडेच, वळसे पाटलांकडेही मोठी जबाबदारी
त्यामुळे विरोधकांकडून बिनखात्याचे मंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका होत आहे. खातेवाटपाचा तिढा लवकर सुटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या वारंवार बैठका होत आहे.अशातच गुरूवारी रात्री सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीतून खातेवाटपाबाबत तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहिनुसार, अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच मिळणार आहे. तर सहकार मंत्रालयाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही दोन महत्त्वाची खाती जाणार, असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
विशेष बाब म्हणजे, सुरुवातीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (Cabinet Expansion) ही खाती भाजपाकडे होती. आता मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश झाल्याने ही खाती भाजपाकडून राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांना अर्थ खाते देऊ नये यासाठी शिंदे गटातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काहीही करा, पण अजितदादांना अर्थ खातं देऊ नका, असं शिंदे गटातील आमदारांचं म्हणणं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने आता अर्थ खाते अजित पवारांना मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
Comments
Post a Comment