पावसाचा कहर ! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश
मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना उद्या सुटी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. IMD ने पुढील दोन-तीन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चार जिल्ह्यांतील शाळांना सुटी जाहीर केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच, पावसाचा जोर पाहता, ज्यादा बसेस सोडण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
"जेथे जेथे पाणी भरू शकते अशा सर्व ठिकाणी यंत्रणा सुसज्ज आहेत. नालासफाई योग्य पद्धतीने झाल्याने यावेळी कुठेही पाणी भरलेले नाही. वॉर्ड ऑफिसर आणि इतर अधिकारी फिल्डवर आहेत. जेथे पाणी जास्त भरत आहे तेथे सक्शन पंप लावले आहेत. त्यामुळे पाणी भरून देत नाहीयेत. मी स्वत: कंट्रोल रूममध्ये जाऊन माहिती घेतली आहे. स्टेशनवर झालेली गर्दी पाहता सीएसटी, भायखळा, दादर, कुर्ला, ठाणे, डोंबिवली या स्टेशनवर BEST आणि एसटीच्या ज्यादा बसेस सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना सुटी देण्यात आली आहे," असे शिंदे यांनी सांगितले.
राज्यभरात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, वाशीम, गडचिरोली यासह अन्य ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विधानभवन येथे प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठल्याही प्रकारे आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत असं म्हटलं आहे.
Comments
Post a Comment