अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी.... ! मोदींचा पुणे दौरा सुट्टीचं खरं कारण?
राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. अनेक भागात नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग सोडला तर सर्वत्र पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या जात आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या यावेळच्या पावसाळी अधिवेशनाला ४ दिवसांचा ब्रेक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोमवार आणि मंगळवारी (३१ जुलै आणि १ ऑगस्ट) विधिमंडळाचे सत्र न घेण्याचा निर्णय काल(गुरुवार)च्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हे या सुट्टीचे खरे कारण असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधींची निश्चितच गरज भासणार आहे. अनेक ठिकाणी नुकसानाची पाहणी, तेथील पंचनामे आणि भरपाईचे दावे करणे गरजेचे आहे, म्हणून आमदारांनासाठी देखील मतदारसंघात आढावा घेणे महत्त्वाचे झाले आहे.
पुरवणी मागण्या आणि नियोजन विधेयकाला मंजुरी हे पावसाळी अधिवेशनातील सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यामुळे अधिवेशन शुक्रवारीच संपवावे या दृष्टीकोनातून खटपट सुरू होती. अतिवृष्टी, पुरामुळे आमदार मतदारसंघांमध्ये परतले आहेत. याचा आमदारांच्या उपस्थितीवर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करण्यात आल्याचं बोललं जात होतं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पूर्णवेळ कामकाज व्हावे, या मताचे होते. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही अधिवेशन गुंडाळण्यास विरोध केला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अनुक्रमे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समिती बैठकांमध्ये नियोजित तारखेपर्यंत, म्हणजे ४ ऑगस्टपर्यंत अधिवेशन सुरू ठेवावे, असे ठरवण्यात आले होते. मात्र, सोमवार-मंगळवारी सुट्टी देऊन केवळ बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस कामकाज चालवावे, असा निर्णय घेण्यात आला.
मोदींच्या दौऱ्याची पार्श्वभूमी सुट्ट्या दिल्याची चर्चा
आमदारांना मतदारसंघांत जाऊन पूरस्थिती हाताळता यावी, यासाठी सुट्टी दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आधीच शनिवार-रविवारी सुट्टी असताना आणखी दोन दिवस का, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुण्यात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सत्ताधारी आमदार तेथे असतील. याचा विधिमंडळ कामकाजावर परिणाम होईल. केवळ मंगळवारी कामकाज बंद ठेवले, तर एका दिवसासाठी बहुतांश आमदार मुंबईत येण्याचे टाळतील म्हणून दोन दिवस सुट्टी दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
Comments
Post a Comment