देशात पावसाचं थैमान! राज्यासह मुंबई पुण्याची परिस्थिति काय.?
उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, झाडे पडणे आणि वीज पडून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्ये सर्वाधिक 11 मृत्यू झाले आहेत.याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये 8, उत्तराखंडमध्ये 6, दिल्लीत 3, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या मंडीत बियास नदीच्या प्रवाहात ४० वर्षे जुना पूल वाहून गेला आहे. दिल्लीत 41 वर्षांनंतर जुलैमध्ये एका दिवसात 153 मिमी पाऊस झाला आहे. पावसामुळे उत्तर रेल्वेने १७ गाड्या रद्द केल्या आहेत. 12 गाड्यांचे मार्ग बदलावे लागले आहेत.
तर दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात मध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर देशातील अनेक राज्यांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पावसाची काय परिस्थीती?
देशभरात पावसाने थैमान घातलं आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्याकाही भागात पावसाने हजेरी लावली, तर काही भागात पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तर आज कोकण विभाग आणि तळ कोकणात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही आज मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान नगर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि सोलापुर या जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Comments
Post a Comment