अजित पवार गटाचे सगळे आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला; अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुन्हा खळबळ
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे, या पार्श्वभूमिवर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. दरम्यान काल शरद पवारांची अचानक भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाचे सगळे आमदार आणि मंत्री पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेणार आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना पाहायला मिळाला. यानंतर काल अचानक अजित पवार आणि त्यांच्या सोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि आमदार शरद पवारांच्या भेटीला पोहचले होते.
यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हेच आमचे दैवत असल्याचे म्हटले होते. तसेच प्रफुल्ल पटेलांनी काल मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडांबद्दल दिलगीरी देखील व्यक्त केली होती.
आम्ही शरद पवार यांच्या पाया पडून आम्ही त्यांचे आशिर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली, आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे असी विनंती देखील केली, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले होते.
शरद पवारांचं मौनच
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांची काल भेट घेत त्यांच्यासमोर पक्ष एकसंध ठेवण्यासाठीचा विचार करावा असा प्रस्ताव ठेवला. मात्र शरद पवारांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील या दोन्ही जेष्ठ नेत्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा हे सर्व बंडखोर आमदार, नेते शरद पवारांच्या भेटीला गेल्याने आता शरद पवार काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment