एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; पडद्यामागे नेमकं घडतंय काय..?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अचानक दिल्लीकडे रवाना होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठमोठे भूकंप होत असल्याने पडद्यामागे नेमकं चाललंय काय? असा प्रश्न पडतोय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. आज रात्री ९ वाजता मुख्यमंत्री तातडीने दिल्लीला रवाना होत आहेत. हा दौरा पूर्वनियोजित नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री अचानक का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भाजप पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेणार आहेत. परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आता मुख्यमंत्री राज्यातील परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेतल्यानंतर त्याचे परिणाम दिसून आहेत का? यासंदर्भात ही भेट होणार आहे. तसेच राज्यातील इतर राजकीय, सामाजिक परिस्थितीबद्दल भाजपचं केंद्रीय नेतृत्व माहिती घेणार असल्याचं कळतंय. ही राजकीय भेट असल्याची माहिती आहे.
२ जुलै रोजी अजित पवार यांनी भाजप सरकारला पाठिंबा देत राष्ट्रवादीमध्ये भूकंप घडवून आणला होता. आज अजित पवार यांच्यासोबत ३५पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात असून ९ जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतलेली आहे. त्यामुळे भाजपला अपेक्षित बदल आणि इतर परिणाम जाणून घ्यावयाचे आहेत. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
Comments
Post a Comment