अजित पवारांचे बंड मोडून.. ? BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी काय असणार ?
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पडलेले भगदाड बुजवताना शरद पवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे पण शरद पवार हे सध्या देशातले सगळ्यात मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात.
तेव्हा अशी अनेक बंड याआधी शरद पवारांनी पचवली आहेत. अजित पवारांचे बंड मोडून काढण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांचा प्लॅन काय आहे? पवार पुन्हा राष्ट्रवादी कशी उभी करणार आणि शरद पवारांची नवी खेळी काय असणार? हे सगळं जाणून घेऊया. अजित पवारांच्या बंडानंतर झालेल्या पत्रकार पऱिषदेत शरद पवारांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोणता? शरद पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता एका सेकंदात उत्तर दिलं शरद पवार.
तेव्हा शरद पवार हेच राष्ट्रवादीचा चेहरा असले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी करण्यासाठी पवारांनी कंबर कसली आहे. तीन टप्प्यात शरद पवार हे राष्ट्रवादी पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
पहिला प्लॅन आहे पक्षविस्तार
राज्यातल्या महत्वाच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात सभा घेऊन पक्ष बांधणी करणार. राष्ट्रवादीची ताकद ज्या जिल्ह्यात आहे तिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकत्र आणून मोर्चेबांधणी करणार.
यातली पहिली सभा ही येवला येथे झाली. या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तेव्हा जास्तीत जास्त जिल्ह्यात हाच प्रयोग शरद पवार करतील असा होरा आहे.
दुसरा प्लॅन आहे तो पर्यायी नेतृत्व तयार करण्याचा
शरद पवारांनी जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार फुटले आहेत तिथे तिथे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना ताकद देण्याचे काम सुरु केले आहे.
उदाहरण घ्यायचेचे झालं तर पारनेरमध्ये नीलेश लंकेंविरोधात झावरेंना तर नगरमध्ये संग्राम जगताप यांच्या विरोधात अभिषेक कळमकर यांना शरद पवारांनी पुन्हा जवळ केलं आहे. पक्षात नवी जबाबदारी दिली आहे. तेव्हा असे नेतृत्व तयार करुन त्यांना निवडणूकीत उतरवण्याचा पवारांचा बेत आहे.
तिसरा प्लॅन आहे तो भाजपला खिंडार पाडण्याचा
भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एक झाल्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या अनेक आजी माजी नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. जागावाटपामध्ये भाजपला अनेक ठिकाणी अॅडजस्ट करावे लागणार आहे.
तेव्हा या नाराज आणि अस्वस्थ भाजप नेत्यांना स्वत:च्या गोटात खेचण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या गटाकडून केला जात आहे. असं झालं तर पवार भविष्यात भाजपला नक्कीच हादरा देऊ शकतात.
Comments
Post a Comment