शिंदे गुवाहाटीत असताना गेल्यावर्षीच राष्ट्रवादीच्या 51 आमदारांनी… प्रफुल्ल पटेल यांचा सर्वात मोठा खळबळजनक दावा काय?

  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना गाफील ठेवून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पडद्यामागे नक्की काय घडलं याचा गौप्यस्फोट आता होऊ लागला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चांगलीच कोंडी होणार असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी द टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. ते आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी शरद पवार यांच्याकडे पत्र देऊन भाजपसोबत जावं असा आग्रह धरला होता. पण शरद पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पटेल यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेतृत्व अपयशी ठरलं

शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तेत जाण्याची राष्ट्रवादीला संधी होती. राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपशी युती करण्याचा आग्रह पक्षाध्यक्षांना धरला होता. पण राष्ट्रवादीचं नेतृत्व निर्णय घेण्यात अपयशी ठरलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं, असा दावाही पटेल यांनी केला.

अनेक आमदार अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांच्या मतदारसंघात निधी मिळत नाही. आर्थिक कारणामुळे विकासकामे करता येत नाहीत. शेतकऱ्यांसह अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन करावी, असं आमदारांचं म्हणणं होतं.

मोदींच्या नेतृत्वात लढणार

2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवू. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहोत. महाविकास आघाडी कमकुवत झाल्याने शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी मोठ्या फरकाने विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..