..तर ‘गोकुळ’ दूध संघासह जिल्हा बँकेतही परिवर्तन शक्य
राज्यातील फॉर्म्युला जिल्ह्यात लागू झाला तर मंत्री हसन मुश्रीफ यांना महाडिक गट, शिंदे गट व भाजपसोबत मिळते-जुळते घ्यावे लागेल. असे झाले तर मात्र, ‘गोकुळ’ दूध संघात आमदार मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची असणारी सत्ता बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गोकुळ दूध संघात अनियमिता असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे खुलासेही मागवले असल्याचे सांगितले होते. यातच आज ‘गोकुळ’चे प्रमुख नेते आमदार मुश्रीफ यांनी भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र येत असतील तर कोल्हापूर जिल्ह्यातही हाच फॉर्म्युला लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘गोकुळ’वर कारवाईऐवजी सत्ताबदल करून भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची सत्तास्थापन होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सत्ता आल्यानंतरही ‘गोकुळ’मधील सत्ता परिवर्तन होईल, या चर्चेने जिल्हा ढवळून निघाला होता. यामध्ये स्थानिक पातळीवर राजकारणाचा विचार करत बहुसंख्य नेत्यांनी या सत्तेला कोणताही धक्का लावला नाही. आता मात्र मुश्रीफ हेच सत्तेचे वाटेकरी झाल्यामुळे गोकुळमधील सत्ताही घेण्यास कोणतीही अडचण नसावी, यासाठी स्थानिक पातळीवरील भाजप, शिंदे गट किंवा विरोधक पुढाकार घेऊ शकतात. दरम्यान, ‘गोकुळ’मध्ये सत्ताबदल झाला तर जिल्हा बँकेच्या सत्तेवरही परिणाम होऊ शकतो, असेच चित्र समोर येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख सहकारी संस्थांमध्ये नेत्यांची सत्ताही एकमेकांवर अवलंबून आहे. गोकुळमध्ये काही घडामोड घडल्यास इतर संस्थांमध्ये बदल नाकारता येत नाही.
https://www.highrevenuegate.com/qup2qgnjcn?key=b68b0330037f41bee3a5b220d07775c7
Comments
Post a Comment